अमळनेर दि.२८:- अवकाळी व मुसळधार पावसाने अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके हातातोंडाशी आली असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा संपूर्ण हंगाम वाया गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अनिल पाटील यांनी कृषीमंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.आपल्या निवेदनात आमदार पाटील यांनी नमूद केले आहे की, खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दिलेला दगा, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काढणीच्या अवस्थेत असलेली कपाशी, मका, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
अमळनेर तालुक्यातील एकूण ८१,२१२ हेक्टर क्षेत्रापैकी
४६,९४८ हेक्टर – कपाशी
२९,४१२ हेक्टर – मका
३,५४४ हेक्टर – ज्वारी
७४७ हेक्टर – बाजरी
२०० हेक्टर – सोयाबीन
या सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.शासनाच्या सध्याच्या निकषांनुसार फक्त उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो. मात्र या अवकाळी पावसात कापणी झालेली आणि शेतात साठवलेली पिकेही पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने विशेष आदेश देऊन सर्व प्रकारच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी आमदार पाटील यांची ठाम मागणी आहे.“शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हे संकट गंभीर असून शासनाने तातडीने मदत न दिल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल,” अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.






