शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे – राकेश वाणी

0

नंदुरबार, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक पिकाचे उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करुन वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टीक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्यासाठी जिल्ह्यात अन्नधान, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या रब्बी हंगाम 2023 पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत असून; या पीकस्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. रब्बी हंगाम पीकस्पर्धेसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा पाच पिकांची निवड केली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमिन असणे व ती जमिन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकास्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, 8-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकस्पर्धेत सहभागी शेतकऱ्याने संबंधित सातबाऱ्यावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रुपये 300 व आदिवासी गटासाठी रुपये 150 प्रवेश शुल्क राहील. पिकस्पर्धेचा निकाल तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने निवडण्यात येणार असून या पीकस्पर्धेसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकापातळीवर पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार रुपयांचे बक्षिस राहील. तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षिस 5 हजार रुपये असेल. तसेच राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार रुपये बक्षिस राहील. रब्बी हंगामातील पिकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2023 आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असेही श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.