परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करावे – चंद्रकात पवार

0

नंदुरबार,दि.18 (जिमाका वृत्तसेवा) सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी नंदुरबार जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रुपये 6 लाख पर्यंत असावी. राज्यातील मागासवर्ग गटामध्ये आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होवून त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी परदेशातील विद्यापिठामध्ये शासन निर्णयात नमूद विविध अभ्यासक्रमासाठी ज्या अनुसूचित जमातीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशा 10 विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल. यासाठी नंदुरबार प्रकल्पांअतर्गत येणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना (मुला-मुलींना) परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेसाठी परदेश शिष्यवृत्तीचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथे जमा करण्यात यावेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार याहामोगी चौक नवापूर रोड नंदुरबार दुरध्वनी क्र. (02564) 210303 येथे संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे.