नंदुरबार, दि. 20 :- रब्बी हंगाम 2023 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. रब्बी हंगामासाठी नैसर्गिक आग, नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, दुष्काळ, भुस्खलन, पूर चक्रीवादळ गारपीट, कीड व रोग यासारख्या अकल्पित परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. योजनेत समाविष्ट शेतकऱ्यांनी बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनी, कृषि विभाग, संबंधित बँक, किंवा टोल फ्री क्रमांक 11004195004 वर कळवावे. ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई यांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र असून ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. रब्बी ज्वारी (जिरायती) पिकासाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500, गहू पिकासाठी प्रति हेक्टरी 45 हजार, हरभरा पिकासाठी प्रति हेक्टरी 37 हजार 500 तर उन्हाळी भुईमूगसाठी प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित रक्कम असून सर्व पिकांसाठी शेतकऱ्यास केवळ 1 रुपये शेतकरी हिस्सा भरावा लागणार आहे. रब्बी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर 2023, गहु व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2023 तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च 2024 पर्यंत पिक विमा हप्ता भरण्याची मुदत आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित मुदतीपूर्वी नजीकची बॅक शाखा, आपले सरकार केंद्रावर विमा हप्ता व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. या योजनेत जास्तीत जास्त शेकऱ्यांनी सहभागी व्हावे असेही श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.