जिल्हा परिषद योजनांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करा – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

0

जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा !

जळगाव, दि.२८ (जिमाका) – जिल्हा परिषद योजनांची व्यापक स्वरूपात अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून उणीवांवर मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित बैठकीत दिला. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुड्डेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. यावेळी विविध योजनांचा आढावा घेताना त्या योजनेची उद्दिष्ट व आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी जाणून घेतली. शासनाच्या विविध घरकुल योजनांचा आढावा घेतांना श्री. गमे म्हणाले, घरकुल योजनेची अंमलबजावणी करताना अडचणींवर मात करून थेट शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी थेट गाव पातळीवर जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी व मंजूर घरकुलांचे कामे का थांबले आहेत. याबाबत तोडगा काढून घरकुलांसाठी प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची संख्या वाढवणे देखील गरजेचे आहे. असेही विभागीय आयुक्त श्री गमे यांनी सांगितले. जोपर्यंत अधिकारी कार्यालय सोडून गावागावात जाऊन ग्रामस्थांशी थेट चर्चा करत नाही तोपर्यंत शासकीय योजनांचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. घरकुलांची प्रस्ताव पात्र करण्यात जातीच्या दाखल्यांची येत असलेली अडचण दूर करण्याच्या दृष्टीने तालुका पातळीवर किंवा गाव पातळीवर वेगवेगळ्या तारखांना कॅम्प लावून जातीचे दाखल्यांचे वितरण करावे. असे सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.