साकळी येथे जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद शाळेत दि.७ व ८रोजी जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रकारचे स्पर्धांचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांमध्ये लंगडी, कबड्डी, रस्सीखेच अशा सांघिक स्पर्धांचा तर धावणे, लिंबू चमचा, तीन पाय शर्यत, लांब उडी अशा वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन दिवशीय क्रीडा स्पर्धांमध्ये दि.७ रोजी सांघिक स्पर्धा अगदी उत्साहवर्धक वातावरणात पार पडल्या. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही उत्साह होता.दि. ८ रोजी या स्पर्धांचा समारोप करण्यात आला.
सध्याच्या डिजिटल युगामध्ये खेळाचे महत्व अधोरेखित करीत खेळामध्ये जिंकणे महत्त्वाचे नसून सहभागी होणे महत्त्वाचे असल्याचे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य परमानंद बडगुजर हे होते तर प्रेमकांत फाउंडेशन खान्देश विभागचे प्रमुख विनायक सोनवणे याप्रसंगी विशेष उपस्थित होते. यावल चे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनीही या स्पर्धांच्या उद्घाटन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साकळी केंद्रांतर्गत विविध गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच तथा सदस्य व विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सदस्य, विद्यार्थी पालक, क्रीडाप्रेमी, केंद्रांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर, किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनार, तसेच डांभुर्णी किनगाव आणि दहिगाव केंद्रातील काही शिक्षकांनी या स्पर्धा प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. या क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाकरिता साकळी गावचे सरपंच दिपक पाटील, प्रेमकांत फाउंडेशन खानदेश प्रमुख विनायक सोनवणे, प्रेमकांत फाउंडेशनच्या जस्मिन परेश शहा, हरेश ओरा, जिल्हा परिषद मुलांची शाळा साकळी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौरभ जैन यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण क्रीडा स्पर्धांचे नियोजन साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. क्रीडा समन्वयक म्हणून समाधान कोळी यांनी भूमिका पार पाडली.